शिरोळ / गीता संघर्ष वृत्तसेवा
दलित वस्तीतील कामांवरून शिरटी ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत सत्ताधारी व विरोधी गटाच्या सदस्यांत खडाजंगी झाली.
सदस्यांमध्ये हमरीतुमरी सुरू झाली. सभागृहातील सदस्यांच्या आवाजाने दोन्ही गटाचे समर्थक आले आणि एकमेकांच्या अंगावर धावून जाऊन बादाबादी सुरू झाली. मात्र, पोलीस घटनास्थळी हजर झाल्याने वाद आटोक्यात आला.
सोमवारी सकाळी ११ वाजता ग्रामपंचायत कार्यालयात मासिक सभा सुरू होती. सभेत विरोधी गटाच्या सदस्यांनी आम्ही सुचवलेली दलित वस्तीतील कामे केली जात नसून त्या प्रभागातील सदस्याला विश्वासात न घेता इतर कामे नियमबाह्य होत असल्याचा आरोप केला.
यावरून सत्ताधारी विरोधकांत जोरदार जुंपली. दरम्यान, सभा सुरू असताना सभागृहाबाहेर असलेल्या काही समर्थकांनी नेत्यांच्या भांडणामुळे आपापसांत वादावादी सुरू केली.
यांचे रूपांतर भांडणात झाले. यावेळी ग्रामपंचायतीसमोर नागरिकांनी गर्दी केली होती. मात्र, घटनास्थळी पोलीस हजर झाल्यानंतर गावातील प्रमुख पदाधिकारी व पोलिसांच्या मध्यस्थीने वाद मिटवण्यात आला.
पोलीस उपनिरीक्षक कुरणे यांनी, ग्रामपंचायत कार्यालयात दोन्ही सदस्यांची बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
दरम्यान सर्व सदस्यांनी एकमेकांना विश्वासात घेऊन काम करण्याच्या सूचना पोलीस उपनिरीक्षक कुरणे यांनी, सरपंच व ग्रामसेवकांना केल्या. यावेळी ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्त अध्यक्ष, पोलीस पाटील यासह नागरिक उपस्थित होते.










0 Comments