मुंबई / गीता संघर्ष वृत्तसेवा।
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली.
शिवसेनेत बंडखोरी केलेले एकनाथ शिंदे गटाचे आमदार आणि भाजप यांनी एकत्र येत, राज्यात सत्ता प्राप्त केली. दि. ३० जून रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली होती. परंतु, अद्याप राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार झालेला नाही. त्यामुळे बंडखोर आमदारांची धाकधूक वाढली आहे. तीन आठवडे झाले तरी राज्याला मंत्रीमंडळ नसल्याने विरोधकही सरकारवर टीका करत आहेत. परंतु, राष्ट्रपती निवडणुकीला फटका बसू नये, म्हणून शिंदे-फडणवीस-शाह यांनी मंत्रिमंडळ विस्तार पुढे ढकलला होता.

फुटीर गटातून मंत्रीपदासाठी अनेक जण इच्छुक असून, मंत्रीपद मिळाले नाही तर ते पुन्हा मूळ शिवसेनेत परत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे जास्तीत जास्त मंत्रीपदे मिळवण्यासाठी एकनाथ शिंदे यांचा आग्रह आहे. तर भाजपमध्येही अनेकजण मंत्रीपदासाठी इच्छूक आहेत. त्यादृष्टीने संभाव्य मंत्र्यांची यादी शिंदे आणि फडणवीस यांनी तयार केली आहे. या यादीवर चर्चा करण्यासाठी हे दोघेही आता नवीदिल्लीत गेले, त्यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेतली. शाह यांच्या अंतिम मंजुरीनंतर लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असे भाजपच्या वरिष्ठस्तरीय सूत्रानं सांगितलंय..
दरम्यान, राज्याच्या मंत्रीमंडळात कोण असावे, याबाबत रा. स्व. संघानेही काही निर्देश दिल्याची माहितीही कानावर आली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच सरसंघचालकांची भेट घेतली होती. या भेटीत याबाबत चर्चा झाल्याचे सांगण्यात येत असून, संघाने या यादीवर नजर मारलेली आहे, असेही विश्वसनीय सूत्रांचं म्हणणं आहे.









0 Comments