Breaking News
Loading...

Ticker

30/recent/ticker-posts

लोकशाहीच्या राज्यात हुकूमशाहीचे पडसाद: महावितरणच्या मनमानी विरोधात खिद्रापूरमधील कुटुंबाचा बेमुदत उपोषणाचा इशारा

कुरुंदवाड/गीता संघर्ष ऑनलाईन डेस्क।


महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी दमदाटी करत जबरदस्तीने जुने मीटर काढून नवीन स्मार्ट मीटर बसवल्याचा आरोप करत, खिद्रापूर येथील पाखरे कुटुंबाने महावितरणच्या कुरूंदवाड उपविभागीय कार्यालयासमोर दि. २३ जून २०२५ पासून बेमुदत प्राणांतिक उपोषणाचा इशारा दिला आहे. संबंधित कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची आणि जुने मीटर पूर्ववत बसवण्याची त्यांची प्रमुख मागणी आहे.


श्री. गणेश नामदेव पाखरे आणि श्री. बाळू कृष्णा पाखरे यांनी महावितरणचे उपभियंता, कुरूंदवाड यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, त्यांचे चुलते गणपती गोपाळ पाखरे यांच्या नावावरील ग्राहक क्रमांक २५२९२०५१ ९९९६ च्या वीज कनेक्शनवर ही घटना घडली. दि. १७ जून २०२५ रोजी दुपारी घरी पुरुष सदस्य कोणी नसताना, एकट्या असलेल्या महिलेला महावितरणचा कर्मचारी असल्याचे सांगून एका व्यक्तीने धाकदपटश्या दाखवल्या. घरी कोणी नसतानाही, कोणतीही संमती न घेता जबरदस्तीने प्रॉपर्टीत प्रवेश करून, व्यवस्थित सुस्थितीत असलेले जुने मीटर काढून नेले आणि नवीन स्मार्ट मीटर बसवले. हा मालमत्तेत अतिक्रमण आणि आगळिक असल्याचा आरोप पाखरे कुटुंबाने केला आहे.

या घटनेमुळे संतापलेल्या पाखरे कुटुंबाने संबंधित "बोगस महावितरणच्या कर्मचाऱ्यांवर" त्वरित कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच, जबरदस्तीने काढलेले जुने आणि सुस्थितीत असलेले मीटर येत्या दोन दिवसांत पूर्ववत बसवावे, अशी त्यांची मागणी आहे. या मागण्या पूर्ण न झाल्यास दि. २३ जून २०२५ पासून महावितरण कार्यालयासमोर बेमुदत प्राणांतिक उपोषण सुरू करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

या निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर, जिल्हा पोलीस प्रमुख कोल्हापूर, तहसीलदार शिरोळ, पोलीस निरीक्षक कुरूंदवाड आणि गट अभियंता, उपकेंद्र टाकळी यांना माहितीसाठी पाठवण्यात आली आहे. पाखरे कुटुंबाच्या या इशाऱ्यामुळे स्थानिक प्रशासनात आणि महावितरणमध्ये खळबळ उडाली असून यावर काय कार्यवाही होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Post a Comment

0 Comments

Breaking News
Loading...