नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. मात्र अद्याप मुख्यमंत्रिपदाच्या नावावर शिक्कामोर्तब न झाल्याने नवीन सरकारचा शपथविधी रखडला आहे. मुख्यमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर महायुतीकडून राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा केला जाऊ शकतो. नवीन सरकार स्थापन होईपर्यंत राज्यपालांकडून एकनाथ शिंदे यांनाच काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
मुख्यमंत्रिपदाबाबत विविध तर्क दिले जात आहेत. भाजपला १३२ जागा मिळाल्या, त्यांचे चार सहयोगी पक्षांचे उमेदवारही आमदार झाले. एका अपक्ष आमदाराने आधीच भाजपला पाठिंबा दिला आहे. आमच्याकडे १४० हून अधिक आमदार असल्याचा दावा भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने केला आहे.
भाजपकडे इतके मोठे संख्याबळ असताना मुख्यमंत्रिपद त्यांनाच मिळेल आणि फडणवीस हेच राज्याचे नवे कर्णधार असतील, ही चर्चा सर्वाधिक आहे. असे असताना फडणवीस यांना भाजपचे लगेच राष्ट्रीय अध्यक्ष करणार, अशी अफवाही उठली आहे.
रा. स्व. संघाचे शताब्दी वर्ष २०२५ मध्ये आहे. अशावेळी मुख्यमंत्रिपद फडणवीस यांच्याकडेच असावे अशी संघाची तीव्र इच्छा असू शकेल. त्या दृष्टीनेही फडणवीस यांचे नाव घेतले जात आहे. तसे झाले तर एकनाथ शिंदेंचे काय, हा प्रश्नही चर्चेत आहे. शिंदे यांना मुख्यमंत्रिपदाचा शब्द देण्यात आल्याचा दावा शिंदेसेनेच्या एका नेत्याने एका वृत्तवाहिनीशी बोलताना केला आहे.
पुढील वर्षाच्या सुरुवातीला मुंबईसह सर्व महापालिका आणि अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील, तोवर शिंदे यांना मुख्यमंत्रिपदी ठेवले जाईल आणि पुढची चार वर्षे फडणवीस मुख्यमंत्री राहतील, असा तर्कही फिरत आहे. मात्र, फडणवीस यांना आताच मुख्यमंत्री केले तरी महायुतीची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील कामगिरी उत्तमच असेल, उपमुख्यमंत्री म्हणूनही शिंदे या यशासाठी योगदान देऊ शकतात, असे भाजपमधील काही नेत्यांचे म्हणणे आहे. आधी फडणवीस यांना दोन वर्षे, नंतर शिंदे यांना दोन वर्षे आणि मग शेवटी अजित पवार यांना एक वर्ष मुख्यमंत्रिपद दिले जाईल, असेही बोलले जात आहे. सोबतच फडणवीस, शिंदे यांना अडीच अडीच वर्षे हे पद दिले जाईल, असा दावाही काही जण करत आहेत. फडणवीस मुख्यमंत्री झाल्यास शिंदे यांना उपमुख्यमंत्रिपद वा महत्त्वाचे केंद्रीय मंत्रिपद दिले जाऊ शकते. अशावेळी खा. श्रीकांत शिंदे हे राज्य मंत्रिमंडळात राहतील, असा तर्कही दिला जात आहे.



0 Comments