टाकळी / गीता संघर्ष वृत्तसेवा :
राज्यातील खासगी साखर कारखानदारांची शिखर संस्था असणाऱ्या वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन ( विस्मा) नवी दिल्लीच्या कार्यकारी मंडळाच्या संचालकपदी टाकळीवाडी (ता. शिरोळ) येथील श्री गुरुदत्त शुगर्सचे एक्झीक्युटीव्ह डायरेक्टर राहूल घाटगे यांची निवड झाली. राज्यातील १३३ खाजगी साखर कारखान्याची शिखर संस्था म्हणून विस्मा कार्य करते. पुण्यात शनिवारी विस्मा च्या झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत विस्माच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत राहूल घाटगे यांची संचालक म्हणून एकमताने निवड करण्यात आली. यावेळी विस्मा चे अध्यक्ष बी.बी. ठोंबरे व मानद सदस्य राज्याचे निवृत साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्या हस्ते श्री. घाटगे यांच्या सत्कार करण्यात आला.
कारखान्याचे चेअरमन व कार्यकारी संचालक माधवराव घाटगे यांनी साखर कारखानदारीत 'गुरुदत्त शुगर्स' हा ब्रँड तयार केला आहे. खासगी साखर कारखानदारीतील उत्कृष्ट व्यवस्थापन व सहकारी साखर कारखानदारीतील शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य व सामाजिक बांधिलकी यांचा उत्तम मिलाप घडवून महाराष्ट्रातील यशस्वी कारखानदारीचे रोल मॉडेल म्हणून 'श्री गुरुदत्त ' कडे पाहिले जाते. राहूल घाटगे यांनी गुरुदत्त शुगर्स च्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी नाविन्यपूर्ण ऊस विकास योजना राबवल्या आहेत. तसेच तरुणांच्या बलस्थानाचा उपयोग करीत महारक्तदान शिबिर राबवले तसेच महापुरात हजारो पूरगस्तांसाठी निवारा छावणी उभा करून त्यांना आधार दिला.
गुरुदत्त शुगर्स चे चेअरमन माधवराव घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली साखर कारखानदारीचा असणारा अनुभव व कौशल्य यांच्या जोरावर विस्माच्या माध्यमातून साखर कारखानदारी समोर असणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. तसेच साखर व इथेनॉल धोरणाच्या संदर्भात केंद्र शासनाच्या दरबारी चर्चा करून व त्याचा पाठपुरावा करून कारखानदारीला उर्जितावस्था आणण्यासाठी माझा प्रयत्न राहील असा विश्वास श्री.राहूल घाटगे यांनी व्यक्त केला.



0 Comments