ही घटना लाखनी तालुक्यातील लोहारा येथे घडली असून अस्मिता महेश मेश्राम (२८) असे मृत पावलेल्या गर्भवती महिलेचे नाव आहे. लाखनी तालुक्यातील लोहारा येथील रहिवासी अस्मिता या महिलेचे प्रसूतीचे दिवस जवळ आल्याने शनिवारी (दि.१४) दुपारी ३ वाजेच्या सुमारास भंडारा येथील शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान ५ वाजेच्या सुमारास गर्भवती महिलेसह अर्भकाचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर गर्भवती महिलेचे शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. या वेळी महिलेच्या मृतदेहासोबत उजव्या बाजूला अर्भक ठेवल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात अर्भक पोटातून काढलेच नव्हते. रविवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास गावातील स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी नेले असता अंत्यसंस्कार करण्याकरिता महिलेच्या मृतदेहासोबत अर्भक आढळून न आल्याने एकच गोंधळ उडाला. याबाबत जिल्हा रुग्णालयात चौकशी केली असता समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. मृत महिलेच्या शवासोबत अर्भक आढळून न आल्याने विविध शंका-कुशंकाना पेव फुटले. त्यामुळे कुटुंबीयांसोबतच ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. या वेळी तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याने पोलिस बंदोबस्त बोलावण्यात आला.
मोठा गोंधळ झाल्याने या संदर्भात जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून मृत अर्भक मातेच्या पोटात असल्याचे सांगण्यात आले. मात्र, कुटुंबीयांनी तसेच ग्रामस्थांनी आमच्या समक्ष पोटात अर्भक असल्याचे दाखवण्यात यावे, अशी भूमिका घेतल्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयातील चमूने घटनास्थळी येत मृत महिलेचा पोटातील अर्भक काढून दिले. अर्भक आढळून आल्याने प्रकरण तेथेच निवळले. त्यानंतर लगेच मृत महिलेसह अर्भकावर अंत्यसंस्कार केले. एकूणच रुग्णालयाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर अाला.



0 Comments