सांगली/गीता संघर्ष वृत्तसेवा।
पलूस तालुक्यातील ब्रम्हनाळ येथे कृष्णा नदीकाठी 14 फुटी मृत मगर आढळून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन महाकाय मगरीच्या भांडणात हा मृत्यू झाला असल्याचा अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे.
शेतीच्या कामासाठी बुधवारी सकाळी काही शेतकरी नदीकाठी गेले असता ही मगर दिसून आली. मात्र या परिसरात नेहमीच मगरीचा वावर असल्याने उन्हासाठी ही मगर काठावर पडली असेल असे वाटले.
परंतु बराचवेळ काहीही हालचाल दिसून न आल्याने काही धाडसी तरुणांनी जवळ जाऊन पाहिले. त्यावेळी त्यांना मगरीचे एक पाऊल व जबडा जखमी असल्याचे निदर्शनास आले.
त्यानंतर याबाबतची माहिती वनविभागास कळवण्यात आली. अधिकारी युवराज पाटील, वनरक्षक इकबाल पठाण आणि कर्मचारी दाखल झाले. त्यांनी पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावून मगर मृत झाल्याची खात्री केली.
मादी जातीची ही मगर जखमी झाल्याने क्षीण होऊन मयत पावल्याचे त्यांनी सांगितले.
त्यावरून प्रतिस्पर्धी मगर या मयत मगरीपेक्षा मोठी आणि ताकदवान असावी, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. औदुंबर डोह ते अंकली दरम्यान शेकडो लहान-मोठ्या आकाराच्या मगरी वास्तव्यास आहेत.
त्यांच्या ठरलेल्या अधिवासात आणि नेहमीच्या मार्गात दुसरी तुल्यबळ मगर आल्यास त्यांच्यात भांडण होते. याचा अर्थ या भागात तितकीच मोठी मगर वास्तव्यास आहे. त्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांनी विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे.









0 Comments