शहर परिसरासह धरण पाणलोट क्षेत्रात गत दोन दिवसांपासून पावसाने संततधार धरल्याने नद्यांच्या पाणी पातळीत पुन्हा गतीने वाढ होत चालली आहे.
मागील २४ तासात पंचगंगेच्या पाणी पातळीत १ फुटांनी वाढ झाली असून मंगळवारी सायंकाळी पंचगंगा नदीची पाणी पातळी ५९.९ फुटापर्यंत पोहोचली होती. पावसाचा जोर असाच राहिला तर बुधवारी सकाळपर्यंत जुन्या पुलावरुन पाणी वाहण्याची शक्यता आहे.
पावसाळ्याच्या प्रारंभाचा महिना पावसाविना गेल्यानंतर जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच काही दिवस वगळता पावसाने दमदार हजेरी लावली आहे. कोकण भागासह धरण पाणलोट क्षेत्र आणि शहर परिसरात पावसाच्या हजेरीमुळे आणि धरणातील पाणी विसर्गामुळे पाणी पातळीत कमालीची वाढ होत चालली आहे.
चार दिवसांपूर्वी पावसाने काहीशी उसंत घेतल्याने पाणी पातळी स्थिरावली होती. परंतु दोन दिवसांपासून पुनश्च पावसाने संततधार बरसण्यास प्रारंभ केल्याने आणि सोमवारपासून सलग पाऊस लागल्याने पाणी पातळीत पुन्हा वाढ होत चालली आहे.
महापालिका प्रशासनाने ही आपत्कालीन यंत्रणा कार्यान्वित केली असून नदीकाठावरील व मळेभागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पावसाच्या सततच्या बरसण्यामुळे मळे भागातील नागरिकांमध्ये पुन्हा २०१९ व २०२१ च्या महापूराची धास्ती निर्माण झाली आहे.







0 Comments