या संदर्भात शिरोळचे तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांना देण्यात आलेल्या निवेदनात महसूल कर्मचाऱ्यांच्या व्यथा मांडण्यात आल्या आहेत.
प्रशासनाने सर्व कामे 'पेपरलेस' करण्याच्या उद्देशाने ई-फेरफार, ई-हक्क, ई-पीक पाहणी आणि डिजिटल सातबारा यांसारख्या प्रणाली अनिवार्य केल्या आहेत. मात्र, या प्रणाली चालवण्यासाठी लागणारे लॅपटॉप, प्रिंटर आणि स्कॅनर २०१६ ते २०१९ दरम्यानचे आहेत. सद्यस्थितीत हे साहित्य कालबाह्य झाले असून, सॉफ्टवेअर लोड होत नसल्याने कामाचा वेग मंदावला आहे. वारंवार मागणी करूनही नवीन साहित्य पुरवले जात नसल्याने अखेर राज्यातील तलाठी संघटनेच्या आदेशानुसार शिरोळमध्येही कामकाज बंद करण्यात आले आहे.
तलाठ्यांच्या या 'पेन डाऊन' आंदोलनामुळे सद्यस्थितीत सुरू असलेली ई-पीक पाहणी, नवीन सातबारा उतारे आणि विविध दाखल्यांसाठी लागणारे फेरफार यांचे काम पूर्णपणे थांबले आहे. ऐन हंगामात शेतकऱ्यांची कामे रखडल्याने ग्रामीण भागात चिंतेचे वातावरण आहे.
या आंदोलनात आणि निवेदनावर मंडल अधिकारी व्ही. आर. आरगे, संतोष पाटील, अश्विनी कुंभार, अमित पडळकर तसेच ग्राम महसूल अधिकारी प्रशांत काळे, अनंत दांडेकर, सुरज माने, आरती चौगुले, जयवंत पवार, संदिप बरगाले, एकनाथ पाटील, संभाजी घाटगे यांच्यासह तालुक्यातील सर्व तलाठ्यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.



0 Comments