कोल्हापूर / गीता संघर्ष ऑनलाईन डेस्क।
गणेशोत्सवाच्या उत्साहात शहरात ठिकठिकाणी गणेशमूर्तींच्या आगमन मिरवणुकी निघाल्या. राजारामपुरीतील बाराव्या गल्लीतील एका गणेश मंडळाने आपल्या मिरवणुकीत डीजे आणि मोठा आवाज करत "आवाज सोडतो, काचा फोडतो" असा फलक लावून थेट प्रशासनाला आव्हान दिले. हा फलक सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आणि नागरिकांमध्ये संताप व्यक्त झाला.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत, राजारामपुरी पोलिसांनी तात्काळ याची दखल घेतली. पोलिसांनी मंडळाचा अध्यक्ष सौरभ पाटील याला पोलीस चौकीत बोलावून घेतले. पोलिसांनी त्याला कायद्याची जाणीव करून दिल्यानंतर त्याने आपली चूक मान्य केली. यानंतर, सौरभ पाटीलने एक व्हिडिओ जारी करत जाहीर माफी मागितली. या व्हिडिओमध्ये त्याने इतर मंडळांनाही पोलिसांच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. पोलिसांनी हा माफीनामा व्हिडिओ व्हायरल केल्याने सर्वत्र याची चर्चा सुरू आहे.
ऐन गणेशोत्सवात नियम मोडणाऱ्या मंडळावर पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे सर्वसामान्यांतून स्वागत होत आहे. शहरात आणि जिल्ह्यात प्रशासनाला आव्हान देणाऱ्या अशा मंडळांवरही कठोर कारवाई व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



0 Comments