Breaking News
Loading...

Ticker

30/recent/ticker-posts

मागील गळीत हंगामामधील अतिरिक्त उस दर रु. १०० प्रमाणे दसऱ्याच्या पूर्वी अदा करणार : गणपतराव पाटील

 शिरोळ / गीता संघर्ष वृत्तसेवा। 

  गळीत हंगाम 2022- 23 मधील अतिरिक्त उस दर रुपये 100 प्रमाणे दसऱ्याच्या पूर्वी श्री दत्त कारखान्याच्या सर्व ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यात अदा करीत असल्याची माहिती, उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी दिली. प्रादेशिक सहसंचालक (साखर) कोल्हापूर यांच्याकडून प्रस्ताव मान्यतेनंतर लगेचच ही कारवाही करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

     गणपतराव पाटील पुढे म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील सहकारी/ खाजगी साखर कारखाने, आंदोलक संघटना आणि प्रशासन यांच्यामध्ये यासंदर्भात झालेल्या चर्चेमध्ये मागील हंगामातील (सन 2022-23) शेतकऱ्यांना ज्या साखर कारखान्यांनी उसाचा दर प्रति मेट्रिक टन रुपये 3000 पेक्षा कमी दिलेला आहे त्यांनी रुपये 100 व ज्या साखर कारखान्यांनी उसाचा दर प्रतिमेट्रिक टन रुपये 3000 पेक्षा जादा दिलेला आहे त्यांनी रुपये 50 अतिरिक्त देणे बाबत निश्चित केले होते. याबाबतचा अतिरिक्त ऊस दराचा प्रस्ताव साखर कारखान्यांनी शासनाकडे तात्काळ सादर करावा व पुढील दोन महिन्यात त्यास मान्यता देण्याचे आश्वासन राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूरच्या पालकमंत्र्यांना दिलेले होते. तसेच दोन महिन्यानंतर वरील प्रमाणे अतिरिक्त ऊसदराची रक्कम शेतकऱ्यांना साखर कारखान्यांनी देण्याचे ठरले होते.

        त्या अनुषंगाने श्री दत्त शेतकरी साखर कारखान्याने आपला प्रस्ताव दिनांक 8-12-2023 रोजी शासनास सादर केला होता.

 त्याप्रमाणे प्रति मेट्रिक टनास 100 रुपये प्रमाणे अतिरिक्त ऊस दर श्री दत्त कारखाना दसऱ्याच्या पूर्वी शेतकऱ्यांना देणार आहे. दत्त कारखान्याने आतापर्यंत शेतकरी सभासदांचे हित जपण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. यापुढेही शेतकरी हिताला प्राधान्य देवून काम करण्याची आमची भूमिका कायम ठेवणार असल्याचे गणपतराव पाटील यांनी सांगितले.


Post a Comment

0 Comments

Breaking News
Loading...