खिद्रापूर/गीता संघर्ष वृत्तसेवा।
महाराष्ट्राचा खजुराहो म्हणून प्रसिद्ध असलेले खिद्रापूर हे कोपेश्वर मंदिरामुळे जगप्रसिद्ध आहे. हे मंदिर पाहण्यासाठी देशभरातून भाविक येतात. तसेच परदेशी पर्यटक ही या मंदिरास भेट देतात.
पण या पर्यटन स्थळाला शरद व दत्त कारखान्याचे ग्रहण लागले आहे. या दोन्ही कारखान्यांनी ऊस तोडीच्या टोळ्या मंदिरासमोरील परिसरात नदी घाटाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत उतरवल्या आहेत. या टोळ्यांनी नदी घाट परिसराला हागणदारीचे स्वरूप दिले आहे. तसेच या टोळ्यांनी नदी घाटालगतच स्मशानभूमीचे पावित्र्य देखील राखले नाही. त्यास देखील हागणदारी बनवून टाकले आहे. मंदिर पाहण्यासाठी आलेले पर्यटक भाविक नदी घाटाकडे हातपाय धुण्यास गेले असता नदी घाटाकडे फिरावयास गेले असता त्यांना घाणीचा सामना करावा लागत आहे. तोंडाला रुमाल लावून नाक झाकून घेऊन अर्ध्यातूनच परतावे लागत आहे. मंदिरासमोरच असलेले हे घाणीचे साम्राज्य पाहून ग्रामपंचायतीने दोन्ही कारखान्यांशी सदर जागेतून टोळ्या हलविण्यासाठी पत्रव्यवहारही केला. पण जाणून बुजून राजकीय दबाव वापरत दोन्ही कारखान्यांनी सदर ठिकाणी असलेल्या टोळ्या हलविणे टाळले. इतकेच नाही तर सदर ठिकाणाहून टोळी हलविल्यास सदर गावातील ऊस तोडणार नाही, अशी धमकी टोळी मालक हे देत आहेत व टोळी हलवावी लागू नये याकरिता दुसऱ्या गावी बदली घेण्याची धमकीही देत आहेत. ग्रामस्थ आणि शेतकरी यांच्यात वादविवाद निर्माण होईल अशी परिस्थिती टोळी मालक व कारखानदार हे करीत आहेत. हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या कोपेश्वर मंदिराचे पावित्र्य आणि स्मशानभूमीची विटंबना करण्याचे काम दोन्ही कारखान्याकडून व सदर टोळी मालकांकडून होत असल्याने ग्रामस्थातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.



0 Comments