मुंबई | गीता संघर्ष वृत्तसेवा :
भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या मुलाचा भीषण अपघात झाला आहे. वांद्रे-वरळी सी लिंकवरून जात असताना नरेंद्र मेहता यांच्या चिरंजीवाच्या कारला मोठा अपघात झाला. आमदार पुत्राच्या सुस्साट वेगाने चालणाऱ्या कारने सी लिंकवरील रेलिंगला जोरदार धडक दिली. या धडकेत कारचा चक्काचूर झाला आहे. या अपघातात मेहता यांचा मुलगा जखमी झाला असून त्यांना जबर मार लागला आहे. या प्रकरणी पोलिसांनी रॅश ड्रायव्हिंगचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.
मीरा भायंदरचे भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांचे चिरंजीव तक्षील यांच्या कारला भीषण अपघात झाला. तक्षील हे त्यांच्या लेम्बोर्गिनी हुराकन कारने जात होते. कार सुस्साट वेगाने धावत होती. कार चालवत असताना कारवरील नियंत्रण सुटल्याने ही कार वरळी सी लिंकवर रेलिंगला जाऊन धडकली. त्यामुळे कारचा चक्काचूर झाला आहे. कारचा पुढचा भाग संपूर्णपणे डॅमेज झाला आहे. आज सकाळी 7.30 वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे.
या दुर्घटनेत तक्षील गंभीर जखमी झाले आहेत. तक्षील उजवा हात भाजला आहे. तसेच त्यांना मुका मारही लागल्याचं सांगितलं जात. मात्र, कारमधील इतरांना कुणालाही मार लागलेला नाही. कारमधील सर्वजण सुरक्षित आणि सुखरूप असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. तर, तक्षील यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचंही सूत्रांनी सांगितलं. मेहता कुटुंबीय घटनास्थळी दाखल झाल्याची माहितीही सूत्रांनी दिली.
या अपघातानंतर वरळी सी लिंकवर वाहतुकीची कोंडी झाली. मात्र वरळी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन कार वरळी पोलीस स्टेशनला नेली आणि वाहतूक कोंडी फोडली. दरम्यान, तक्षील यांच्या विरोधात भादंवि कलम 279 आणि 336 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. हा अपघात कसा घडला? याला कोण जबाबदार आहे? याबाबतचाही पोलीस तपास करत असल्याचं सूत्रांनी सांगितलं.


0 Comments