जयपूर/गीता संघर्ष वृत्तसेवा :
या संदर्भात ‘हिंदुस्थान टाइम्स’ने वृत्त दिलंय. हॉटेल मालक अभिमन्यू सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (18 जुलै) रात्री 10:15 च्या सुमारास हर्षदीप आणि इतर पाच-सहा जण मद्यधुंद अवस्थेत हॉटेलमध्ये आले आणि त्यांनी गोंधळ घातला. हर्षदीपचा हॉटेलमधील पाहुण्याशी वाद झाला, त्यानंतर त्या गटाने हॉटेलच्या कर्मचार्यांना प्रत्येक खोली उघडून त्या पाहुण्याला शोधण्याची मागणी केली, असा दावा सिंह यांनी केला आहे.
“हे आमच्या हॉटेल पॉलिसीच्या विरोधात आहे. आमच्यासाठी पाहुण्यांची सुरक्षितता ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. असं सांगून आम्ही डिटेल्स शेअर करण्यास नकार दिल्यानंतर त्यांनी नंतर सुमारे 20-25 जणांना बोलावलं आणि हॉटेलच्या मालमत्तेचं नुकसान केलं. आमचे रेस्टॉरंट हायजॅक करण्यात आलं आणि कर्मचाऱ्यांनी त्यांची मागणी पूर्ण करण्यास नकार दिल्याने परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीही त्या गुंडांनी दिली,” असा आरोप सिंह यांनी केला आहे
सिंह म्हणाले की त्यांनी पोलिसांना 100 नंबरवर फोन केला तेव्हा फक्त दोन पोलीस आले. “ज्या पाहुण्याशी हर्षदीपचा वाद झाला, त्याला शोधलं आणि त्या 25 जणांनी पोलिसांसमोर पाहुण्याला मारहाण केली जी आमच्या सीसीटीव्हीमध्येही रेकॉर्ड झाली आहे,” असंही सिंह यांनी नमूद केलं.
पोलीस त्या पाहुण्याला घेऊन गेले आणि 25 जणांची टोळी बुधवारी पहाटे 3-4 वाजेपर्यंत त्यांच्या हॉटेलच्या आवारात थांबली. “ते दारू आणि जेवण मागत राहिले आणि बिलही भरले नाही. नंतर ते बेसमेंटमधील सर्व्हर रूममध्ये गेले आणि सीसीटीव्हीतील पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही ते करू दिले नाही,” असा दावा त्यांनी केलाय.
दरम्यान, जयपूरमधील वैशाली पोलीस स्टेशनचे एसएचओ शिव नारायण यांनी ‘एएनआय’ला याबाबत माहिती दिली. “या प्रकरणी एफआयआर नोंदवण्यात आला आहे. तक्रारीच्या आधारे चौकशी केली जाईल. आम्ही दोषींवर कारवाई करू,” असं ते म्हणाले. दरम्यान, एफआयआरमध्ये सीसीटीव्ही पुरावे सादर करता येत नसल्याचा दावा सिंह यांनी केलाय. धमकावलं जातंय, त्रास दिला जातोय आणि फोन करून दबाव आणला जातोय, असं ते म्हणाले.
“हर्षदीप हा मंत्र्याचा नातेवाईक असल्याने या प्रकरणाचा माझ्या बिझनेसवर वाईट परिणाम होईल, असं मला लोक म्हणत आहेत. परंतु माझा मुख्यमंत्री अशोक गेहलोत सरकारवर तसेच न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे,” असं हॉटेल मालक अभिमन्यू सिंह म्हणाले.


0 Comments