दत्तवाड/ गीता संघर्ष वृत्तसेवा।
दत्तवाड (ता. शिरोळ) येथील दानवाड रस्त्यावर सिद्धनाळे मळा येथे शेताकडे गेलेल्या एका शेतकऱ्यावर मोकाट कुत्र्यांनी हल्ला केला. सचिन अण्णाप्पा सिदनाळे (वय ४५) असे शेतकऱ्याचे नाव आहे. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून गेल्या 

पंधरा दिवसांमध्ये दत्तवाडमधील कुत्र्यांच्या हल्ल्याची ही दुसरी घटना आहे. सिद्धनाळे मळा येथील शेताकडे सचिन सिदनाळे सकाळी दहाच्या सुमारास गेले होते. यावेळी तीन ते चार कुत्र्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी
झाले. त्यांच्या मानेवर, खांद्यावर व हाता पायांवर गंभीर जखमा झाल्या आहेत. त्यांचा आरडाओरडा ऐकून परिसरातील शेतकरी व नागरिकांनी त्यांची या कुत्र्यापासून सुटका केली. सचिनवर येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथम उपचार करून त्यांना पुढील
उपचारासाठी सिविल हॉस्पिटल सांगली येथे पाठवण्यात आले आहे. याबाबत माहिती मिळताच कुरुंदवाड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बालाजी भांगे यांनी आपल्या सहकार्यासह घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर झालेल्या बैठकीत कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी महानगरपालिकेचे श्वानपथक, वन विभाग तसेच पोलीस प्रशासन मिळून एकत्रित कारवाई करू व मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करू, असे आश्वासन भांगे यांनी दिले.
यावेळी सरपंच चंद्रकांत कांबळे, ग्रामसेवक संतोष चव्हाण, पोलीस पाटील संजय पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.









0 Comments