गडहिंग्लज / गीता संघर्ष वृत्तसेवा.
![]() |
गडहिंग्लज पोलिसांची कार्यवाही - महागाव, नेसरी व चिक्कोडीतील तिघे ताब्यात |

गडहिंग्लज तालुक्यातील मौजे महागाव येथे १ लाख ८८ हजार ६०० रुपयांच्या बनावट नोटा जप्त करत महागाव, नेसरी व चिक्कोडी येथील तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे गडहिंग्लज तालुक्यात खळबळ उडाली आहे.
महागाव गावच्या हद्दीत पाच रस्ता चौक येथे बनावट नोटा खपविण्याच्या उद्देशाने येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तात्काळ सापळा रचून तिघांना ताब्यात घेत त्यांच्याकडून १ लाख ८८ हजार ६०० रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, महागाव येथे बनावट नोटा खपविण्याचा उद्देशाने शनिवार रात्री दोन इसम येणार असल्याची माहिती मिळाली. गडहिंग्लज पोलिसांनी तात्काळ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली साध्यावेषात दोन पथके करून महागाव पाच रस्ता चौकात सापळा रचला. काही वेळाने पाच रस्ता चौकात रस्त्याच्या बाजूला दोन इसम उभे असलेले आढळून आले. तर एक इसम त्यांच्याकडे जात असल्याचे पोलिसांना आढळून आले. संशय आल्याने पोलीस निरीक्षक विक्रम वडणे यांनी पथकाला अलर्ट केले आणि तिघाही संशयित आरोपीवर छापा टाकून रंगेहात पकडले.
अब्दुल रज्जाक आबासाहेब मकानदार (वय २५, रा. चिक्कोडी, जि. बेळगाव) याच्याकडून ६५५०० रु., अनिकेत शंकर हुले (वय २०, रा. महागाव, ता. गडहिंग्लज) याच्याकडून ६७ हजार व संजय आनंदा वडर (वय ३५, रा. नेसरी, ता. गडहिंग्लज) याच्याकडून ५६१०० रुपयांच्या बनावट नोटा पोलिसांनी जप्त केल्या. तर एक दुचाकी ताब्यात घेतली.
सदरची कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके, उपनिरीक्षक विक्रम वडने, हे. कॉ. बाजीराव कांबळे, राजकुमार पाटील, नामदेव कोरी, दादू खोत, दीपक किलेदार, गणेश मोरे यांच्या पथकाने केली.









0 Comments