गडहिंग्लज / गीता संघर्ष वृत्तसेवा
हिरण्यकेशी नदीवरील नांगनूरजवळ दहा फुटाच्या अंतरात असणाऱ्या जुन्या व नव्या बंधाऱ्यामुळे विनाकारण साचून राहणारे पाणी यंदा मर्यादित दिसले .
कारण, पीक नुकसानीला कारणीभूत असलेला जुना बंधारा या वर्षी हटविण्यात आल्याने साचणारे पाणी मर्यादित राहून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. वर्षभर हा बंधारा हटवण्यासाठी पाठपुरावा सुरू होता.
चार किलोमीटरच्या अंतरात नदीमध्ये पाच बंधारे आहेत. नांगनूरजवळचा गोटूर बंधारा जीर्ण झाल्याने नवीन बांधण्यात आला होता . परंतु जुना बंधारा हटवला गेला नव्हता. गतवर्षीच्या महापुरात जवळ-जवळ असलेल्या बंधाऱ्यामुळे अपेक्षित वेगाने पाणी पुढे जात नव्हते. परिणामी या हे पाणी खणदाळ-निलजीपर्यंत साचून राहायचे. नदीत पात्रात पाणी कमी दिसत असले तरी या भागातील पाणी पात्राबाहेर पडायचे. यामुळे शेतकऱ्यांचे गवत व पिकांचे नुकसान होत असे.
शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टळावे म्हणून जुना बंधारा हटवण्यासाठी आमदार राजेश पाटील यांच्यासह नांगनूर ग्रामस्थ आणि भारतीय किसान संघाच्या कार्यकर्त्यांनी सातत्याने कर्नाटककडे पाठपुरावा केला. पाटबंधारे अधिकाऱ्यांपासून मंत्र्यापर्यंत फेऱ्या मारून बंधारा हटवण्यात एक वर्षानंतर यश आले. जुलैच्या पहिल्या पंधरावड्यातील पावसाने नदीला पूर आला.
गोटूरसह इतर दोन बंधारे पाण्याखाली गेले. यंदा एकच बंधारा असल्याने पाण्याचा प्रवाह पूर्वेकडे गतीने सुरु होता. बंधारे पाण्याखाली गेले तरी पाणी म्हणावे तसे पात्राबाहेर नव्हते. यामुळे मोठ्या प्रमाणात पिकांच्या नुकसानीला सामोरे जावे लागले नाही. जुन्या बंधाऱ्यामुळे गतवर्षी असलेली पूरस्थिती आणि यंदाच्या पूरस्थितीवर लक्ष ठेवून शेतकऱ्यांनीच बंधारा हटवल्याचा लाभ झाल्याचे सांगत होते.
दोन बंधाऱ्यांमुळे हिरण्यकेशी पात्रातील पाण्याच्या प्रवाहात अडथळा होता. यंदा जुना बंधारा हटवल्याने पाण्याची फूग गतवर्षीपेक्षा काहीशी कमी होती. शिवाय अधिक दिवस फूगही राहिली नाही. परिणामी शेतकऱ्यांच्या गवताचे नुकसान टळले.








0 Comments