भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध झाले तर सर्वाधिक नुकसान हे साहजिकच नियंत्रण रेषेला लागून असलेल्या परिसरात होईल. त्यामुळे भारत-पाक सीमारेषेपासून जवळ असलेल्या राज्यांमध्ये मॉकड्रील सुरु झाली आहे. या राज्यांमधील लोकांना हवाई हल्ल्यापासून वाचण्यासाठी प्रशिक्षण दिले जात आहे. भारतात सीमारेषेपासून जवळ असलेल्या राज्यांचा विचार करायला झाल्यास त्यामध्ये पंजाब, जम्मू-काश्मीर, गुजरात आणि राजस्थान यांचा समावेश आहे. पाकिस्तानकडून हवाई हल्ला झाल्यास या राज्यांना सर्वाधिक धोका असू शकतो. यापूर्वी झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धात या राज्यांना सर्वाधिक धोका असल्याचे दिसून आले होते. भारतातील उर्वरित राज्य आणि शहरं म्हणजे दिल्ली, मुंबई, पुणे ही सीमारेषेपासून बऱ्याच अंतरावर आहेत. त्यामुळे या राज्यांमध्ये पाकिस्तानकडून हवाई हल्ला होण्याची शक्यता तुलनेने कमी आहे.
तर पाकिस्तानलाही त्यांचे लष्करी तळ असलेल्या भागांमध्ये भारताच्या हल्ल्यापासून सर्वाधिक धोका आहे. उद्या यु्द्ध झाले तर भारतीय लष्कराकडून सीमारेषेलगत असणाऱ्या पाकिस्तानी सैन्याचे तळ उद्ध्वस्त केले जातील. पाकिस्तानी लष्कराचे सर्वाधिक तळ हे पीओके आणि पंजाब प्रांतात आहेत. त्यामुळे हा परिसर युद्धप्रवण क्षेत्र म्हणून ओळखला जातो. भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध होणार की नाही, यादृष्टीने पुढील काही तास महत्त्वाचे मानले जात आहेत. पाकिस्तानी सैन्याने सीमावर्ती भागात हालचाली सुरु केल्या आहेत. त्यामुळे भारतीय लष्कर कमालीचे सावध आहे.



0 Comments