जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान दरम्यान तणाव वाढत चालला आहे. दोन्ही देशांमध्ये युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, भारत लवकरच दहशतवाद्यांविरोधात मोठी कारवाई करणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानकडूनही हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत. आता पाकिस्तानी लष्कराचा मोठा ताफा भारतीय सीमेकडे तैनात करण्यात आल्याचा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.
पाकिस्तानी पंजाबमधून भारतीय सीमेकडे मोठा लष्कराचा ताफा रवाना झाला आहे. पाकिस्तानी पंजाबमधील चिचवटनी, साहिवाल, पट्टोकी भागात हा ताफा तैनात करण्यात आला आहे. पाकिस्तानी लष्कराच्या ताफ्यामध्ये हलक्या तोफांचा देखील समावेश करण्यात आला आहे. भारत आणि पाकिस्तानच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आता पाकिस्तानकडून कुरापती सुरु असल्याचे दिसून येत आहे. तर भारताकडून देखील पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. त्यातच आता पाकिस्तानच्या कुरापतीचा व्हिडीओ समोर आला आहे. त्यामुळे आता पाकिस्तान देखील युद्धाच्या पार्श्वभूमीवर लष्कराने सज्ज होण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे.
ग्लोबल फायरपॉवर इंडेक्स 2025 नुसार, भारताचे लष्कर जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात शक्तिशाली सैन्य आहे. भारताकडे सध्या 14.55 लाख सक्रिय सैनिक, 11.55 लाख राखीव सैनिक, 4,614 रणगाडे, 2,229 हवाई वाहने (त्यामध्ये सुमारे 600 लढाऊ विमाने) आणि 150 युद्धनौका आहेत, ज्यामध्ये 2 विमानवाहू युद्धनौकांचाही समावेश आहे. भारताकडे अग्नि-5, ब्रह्मोस यांसारखी प्रगत क्षेपणास्त्रे आणि उंचावरील युद्धाचा व्यापक अनुभव आहे, जो त्याची लष्करी ताकद अधिक बळकट करतो. त्याचवेळी, पाकिस्तानकडे सुमारे 5.6 लाख सक्रिय सैनिक, 2,496 रणगाडे, 425 लढाऊ विमाने आणि तुलनेने छोटा नौदल ताफा आहे. पाकिस्तानकडे शाहीन-3 सारखी काही क्षेपणास्त्रे असली, तरी लष्करी तंत्रज्ञान, साधनसामग्री आणि प्रशिक्षणाच्या बाबतीत तो भारताच्या तुलनेत पिछाडीवर आहे.
केंद्र सरकारने संपूर्ण देशाची युद्धसज्जता निर्माण करण्यासाठी आणि पाकिस्तान सोबत निर्माण झालेल्या तणावाच्या परिस्थितीमध्ये देशाच्या प्रत्येक नागरिकाला एका सैनिकासारखं सावध बनवण्यासाठी मॉकड्रीलचे निर्देश दिले आहे. स्थानिक पातळीवर जिल्हा प्रशासन तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा या मॉक ड्रीलची अंमलबजावणी उद्या बुधवारी (दि. 7) करणार आहे. केंद्र सरकारच्या मॉकड्रीलच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने हायअलर्ट जारी केला आहे. राज्य प्रशासनाकडून सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याच्या कडक सूचना देण्यात आल्या आहेत. उद्या राज्यातील 16 ठिकाणी मॉकड्रील आणि ब्लॅकआऊट होणार आहे. महाराष्ट्रात मुंबई, उरण-जेएनपीटी, तारापूर, पुणे, ठाणे, नाशिक, थळ-वायशेत, रोहा-धाटाव-नागोठाणे, मनमाड, सिन्नर, पिंपरी-चिंचवड, संभाजीनगर, भुसावळ, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या शहरांचा समावेश आहे.



0 Comments