जिल्ह्यात रेशीम उद्योग वाढीसाठी रेशीम विभाग, कृषी विभाग व जि.प.ला ७०० एकरचा लक्षांक
कोल्हापूर/गीता संघर्ष वृत्तसेवा। रेशीम शेतीचे महत्त्व व त्यातून मिळणाऱ्या हमखास व शाश्वत उत्पन्नाची शेतकऱ्यांना माहिती व्हावी, याकरिता महा-रेशीम अभियान 2024 राबविण्यात येत आहे. दिनांक 20 डिसेंबर 2023 पर्यंत चालणाऱ्या या अभियानात रेशीम शेती प्रचार प्रसिध्दीसह तुती लागवड व टसर रेशीम लाभार्थी नाव नोंदणी करण्यात येणार आहे. यासाठी तयार करण्यात आलेल्या चित्ररथाला हरवी झेंडी दाखवून जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपवनसंरक्षक जी. गुरुप्रसाद, आश्विनी सोनवणे उपजिल्हाधिकारी रोहयो, अरुण भिंगारदिवे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, राजेश कांबळे जिल्हा रेशीम विकास अधिकारी, सी. एस. पाटील वरिष्ठ क्षेत्रसहायक, एस. झेंडे वरिष्ठ क्षेत्रसहायक, पी. बी. चंदनशिवे आदी मान्यवर उपस्थित होते.
दिनांक 20 डिसेंबर पर्यंत इच्छुक शेतकऱ्यांनी नवीन तुती क्षेत्र नोंदणी करण्यासाठी संपर्क साधण्याचे आवाहनही यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले. रेशीम संचालनालयाव्दारे कोल्हापूर जिल्ह्यासाठी रेशीम उद्योग वाढीसाठी रेशीम विभागास 200 एकर, कृषी विभाग 300 एकर व जिल्हा परिषदेस 200 एकर असे मिळून 700 एकर चा लक्षांक देण्यात आला आहे. याबाबत रेशीम विभागासह वन विभाग, रोहयो विभाग, मनरेगा, जिल्हा परिषद, कृषी विभाग, प्रकल्प अधिकारी समतादूत बार्टी यांचा सहभाग असणार आहे.
जिल्हा रेशीम कार्यालयातर्फे तुती लागवडीव्दारे रेशीम कोष उत्पादन योजना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत येत आहे. यात लाभार्थी निवडताना अनुसुचीत जाती, अनुसुचीत जमाती, विमुक्त जमाती, दारीद्रय रेषेखालील कुटुंबे, महिला प्रधान कुटुंबे, शारीरिक अपंगत्व प्रधान कुटुंबे, भुसुधार योजनेचे लाभार्थी, कृषी कर्ज माफी योजनेनुसार अल्प भूधारक सीमांत शेतकऱ्यांना निवडण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत रेशीम विकास प्रकल्पासाठी तीन वर्षामध्ये अकुशल व कुशल मजुरी देण्यात येते. यात तुती लागवड व जोपासनेसाठी ६८२ मनुष्य दिवस व किटक संगोपन गृहासाठी २१३ दिवस असे 'एकूण ८९५ दिवसांची मजुरी देण्यात येते. स्वतः मजूर म्हणून स्वतःच्या शेतात काम करणे आवश्यक आहे.
लाभार्थी निवडताना इच्छुक लाभार्थ्याकडे मध्यम ते भारी व पाण्याचा निचरा होणारी जमीन असावी. नवीन तुती लागवड क्षेत्रासाठी सिंचनाची पुरेशी सोय उपलब्ध असणे आवश्यक आहे. एकरी वार्षिक सर्व खर्च वजा जाता किमान दीड लाख रुपये उत्पन्न निश्चित मिळेल. आणि जिल्ह्यात रेशीम शेती उद्योगासाठी खूप वाव आहे.
अधिक माहिती व संपर्कसाठी राजेश कांबळे, रेशीम विकास अधिकारी - ९८६०८५२०२२, सी. एस. पाटील, वरिष्ठ क्षेत्र सहाय्यक :- ७६६६७३३५२६, एस. झेंगे, वरिष्ठ क्षेत्र सहाय्यक : ९४२१२१४०३८,पी. बी. चंदनशिवे, क्षेत्र सहाय्यक : -८९८३३५०२४३ संपर्क साधावा व ई मेल आयडी : reshimkolhapur@gmail.com या योजनेचा लाभ घेण्यासाठी आठमाही सिंचनाची सोय व खर्च करण्याची तयारी असलेल्या शेतक-यांनी जिल्हा रेशीम कार्यालय ५६४ ई वॉर्ड, व्यापारी पेठ शाहूपुरी कोल्हापूर येथे संपर्क साधावा.
रेशीम उद्योगाकरिता शासनामार्फत मिळणाऱ्या सोईसवलती- शासनामार्फत रेशीम उद्योगाचे प्रशिक्षण व वेळोवेळी प्रत्यक्ष बागेस भेट देऊन तसेच मेळावे, चर्चासत्र, कार्यशाळा आयोजित करुन शेतक-यांना मार्गदर्शन देण्यात येते. मोफत अभ्यास दौरे आयोजित करुन शेतकऱ्यांना रेशीम शेती उद्योगाविषयी माहिती करुन दिली जाते. शासनामार्फत 75 टक्के सवलतीच्या दरात अंडीपुंजाचा पुरवठा केला जातो.
तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत अनुदान देण्यात येते. हे अनुदान ३ वर्षात विभागून दिले जाते व किटक संगोपन गृहासाठी अनुदान देण्यात येते. तुती लागवड व जोपासनासाठी 3 लाख 97 हजार 335 रुपये इतके अनुदान देण्यात येते.



0 Comments