Breaking News
Loading...

Ticker

30/recent/ticker-posts

जितेंद्र आव्हाड गरजले : शासन आपल्या दारी आणि महाराष्ट्र झाला भिकारी

 मुंबई /गीता संघर्ष वृत्तसेवा। 

 एकीकडे राज्यात शेतकरी दुष्काळग्रस्त झालेला असतानाच सरकारकडून ‘शासन आपल्या दारी ‘हा उपक्रम राबविण्यात येत आहे. ’ या सरकारच्या उपक्रमावरून राष्ट्रवादी काँग्रेसने शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. ‘शासन आपल्या दारी आणि महाराष्ट्र झाला भिकारी,’ अशी स्थिती सत्ताधाऱ्यांकडून निर्माण करण्यात आली आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

याबाबत पुढे बोलताना ते म्हणाले , पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. पाऊस नसल्याने पिके करपत आहेत. कर्नाटक सरकारने आपल्या राज्यात दुष्काळ जाहीर केला आहे. महाराष्ट्र सरकारनेही दुष्काळ जाहीर करून शेतकरी बांधवांना साह्य करण्याची भूमिका घ्यावी, अशी मागणी आव्हाड यांनी केली. तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या काळात राज्यात अनेक उद्योग येत होते. ही माहिती अधिकृतपणे समोर देखील आली आहे. पण आता राज्यात धार्मिक, जातीयद्वेष वाढीस लागत असल्याने उद्योजक महाराष्ट्रात येण्यास तयार नाहीत, असा दावाही राज्याचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला. दरम्यान सनातन धर्माला विरोध करणाऱ्यांना 2024मध्ये मोक्ष मिळेल, असे वक्तव्य योगगुरू रामदेव बाबा यांनी केले आहे. यावर प्रतिक्रिया देताना आमदार आव्हाड म्हणाले, रामदेव बाबा यांना धार्मिक विषयावर महत्व देणे चुकीचे ठरेल. पण, मोक्ष देणार म्हणजे आम्हाला मारणार का? असा सवाल त्यांनी केला.

दरम्यान सनातन धर्माच्या विचारांनीच या देशाला रसातळाला नेले आहे. म्हणून आमचा सनातन धर्माला विरोध आहे, असे सांगून आव्हाड म्हणाले, सनातन धर्माची बाजू घेणाऱ्या लोकांना काही प्रश्न आहेत, त्याची त्यांनी उत्तरे द्यावीत. चार्वाक, बसवेश्वर यांना कोणी मारले? छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक कोणी नाकारला? महात्मा जोतिराव फुले यांच्यावर मारेकरी कोणी धाडले? स्त्रीशिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांच्यावर शेणगोटे कोणी मारले? सती प्रथेविरोधात लढणाऱ्या राजा राममोहन रॉय यांच्यावर तलवार उगारणारे कोण होते? राजर्षी शाहू महाराज यांच्या बदनामीचा आणि त्यांना ठार मारण्याचा कट रचणारे कोण होते? विशिष्ट जात-समूहाला पाणी पिण्यापासून रोखणारे कोण होते? हे सर्व कृत्य करणारे सनातनी धर्माचे पाईक होते ना? त्यांना आपण विरोध करतच राहणार आहोत. भले आम्हाला मोक्ष देण्याची भाषा केली तरी बेहत्तर, अशा शब्दांत जितेंद्र आव्हाड यांनी रामदेव बाबांचा समाचार घेतला.

Post a Comment

0 Comments

Breaking News
Loading...