Breaking News
Loading...

Ticker

30/recent/ticker-posts

ते साडेतीन तास जीवघेणे

सांगली/गीता संघर्ष वृत्तसेवा। 


 नागठाणे, ता. पलुस येथे बंधाऱ्यावर गाडी घरून कृष्णेच्या पुरात पडलेले, मात्र, वाळवा गावच्या कोटभागात राहणारे असल्याने पोहण्याची सवय आणि काहीही करून जगण्याची जिद्द यामुळेच तीन तास कृष्णा नदीच्या पुरात केलेल्या धडपडीमुळे राजेंद्र तानाजी मोटे ( वय ५३) यांना जीवदान मिळाले आहे.  बुधवारी सायंकाळी ही घटना घडली.

राजेंद्र मोठे हे इस्लामपूर येथील कर्मवीर पतसंस्थेमध्ये एक सचिव म्हणून काम करतात. कामानिमित्त ते पलुसला गेले होते. परतताना त्यांची दुचाकी नागठाणे बंधाऱ्यावरून घसरली आणि तोल जाऊन वेगवान व प्रवाही असणाऱ्या वाहत्या धारेत कृष्णा नदीपात्रात पडले. ही घटना सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान घडली. गाडी तशीच बंधाऱ्यावर पडली होती. त्यांना पात्रात पडताना कोणीही पाहिलं नव्हतं. तिथून शिरगावला जाणारे अरुण गजानन पाटील ( रा. शिरगांव ) यांना गाडी दिसली. तसेच नदीपात्रात कोणीतरी लाटेबरोबर बुडताना दिसले. तोपर्यंत मोटे हे बंधाऱ्यापासून साधारण शंभर मीटर दूर गेले होते. नदीचा प्रवाह हा खूपच गतिमान होता. ते पोहताहेत की बुडताहेत हे समजत नव्हते. एका क्षणात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. बघ्यांची गर्दी झाली. मात्र, या प्रवाहात वाचवायला झेपावण्याचे धाडस कोणीच करू शकत नव्हते. गाडीला लावलेल्या पिशवीतील माहितीवरून व्यक्ती वाळव्याची आहे हे समजून त्यांच्या विक्रम मोठे या मुख्याध्यापक चुलत भावाला बोलावण्यात आले. पुढचा अर्धा तास तरी राजेंद्र मोटे हे पात्रात दिसत होते. परंतु जिवंत आहेत का हे समजत नव्हते.

 दरम्यान, एक व्यक्ती पाण्यात वाहत असून वाळवा, शिरगाव, हवलदार वस्ती येथे दिसल्यास वाचवा असे संदेश दिले गेले. नदीत राजेंद्र मोटे जिवाच्या आकांताने पोहतच होते. गतिमान प्रवाहत पोहणे मुश्किल होते. त्यातच त्यांच्या अंगावर रेनकोट असल्यामुळे त्यात पाणी भरले. कधी ते पाण्यात बुडत होते, तर कधी वर येत होते. त्यांनी तीन वेळा शिरगावच्या कडेला जायचा प्रयत्न केला. पण पाण्याच्या गतीने त्यांना परत आत ढकलले. अंगातील त्राण संपत चालला होता. काही लोकं बंधाऱ्यावरून व्हिडिओ काढत होते आणि राजेंद्र मोटे आतून मोठ्याने आवाज देत होते. लोकांना मोटे दिसायचे बंद झाले. पण त्यांना बाहेरील लोक व्यवस्थीत दिसत होते. लोकांनी ते आता जिवंत असतील अशी आशा सोडून दिली होती. तरीही चार गावातील लोक व वाळवा येथील खेळाडू मित्र शोध मोहीमेत सहभागी होते

 सायंकाळी ७ पर्यंत लोकांनी नदीकाठ पिंजून काढला. पण, अंधार पडल्यामुळे शोधमोहीम थांबवण्यात आली. लोकं काठावर ठिकठिकाणी जागे होते. मोटे हे नदीच्या प्रवाहाबरोबर कधी वाहत तर कधी पोहत होते. अशातच रेनकोटच्या भिजण्यामुळे अंगातील त्राण संपलेच होते. तेवढ्यातही त्यांनी शक्ती एकवटून रेनकोटची चेन, बटणे तोडली. रेनकोट पाण्याने मोकळा झाला. कबड्डीचे एक उत्कृष्ट व चपळ खेळाडू असल्याने स्वतःच्या मानसिक व शारीरिक स्थितीचा अंदाज त्यांना आला. कधी उताणे पडून हातपाय न हालवता चार ते पाच मिनिटे पडून रहायचे. दम गेला की ते पुन्हा पोहायचे. त्यांनी आता ठरवून टाकले होते की, पाणी आता कुठे नेईल तिकडे जायचे. डोळ्यासमोर आमणापुरचा पुल आणि भिलवडीचा पुल असे दोन पर्याय समोर दिसत होते. तेही रात्री पावणे आठ वाजता. कोणत्याही एका पुलाचा कठडा हाती लागणार याची पूर्ण खात्री होती.अंधारात काहीही दिसत नव्हते. फक्त पाणी आणि पाणीच दिसत होते. यात दोन तास झाले होते. आतापर्यंत तरी आपण जिवंत आहोत याचेच त्यांना अप्रूप वाटत होते. मध्येच पाण्यात उताणे पडून ते नाकाने श्वास घेऊन तोंडाने मोठ्याने सोडू लागले. त्यामुळे त्यांना बरेच हलके वाटू लागले. जगायची इच्छा त्यांना धीर सोडू देत नव्हती. साधारण सव्वाआठ वाजता त्यांना पाण्यात एक मोठ्ठा निळा बॅरल दिसला. आपण जिवंत राहतोय हे आता पक्के झाले. तिथे प्रवाह संथ होता. आपण पात्राच्या कडेला आल्याचे त्यांना जाणवले. त्यांच्या हाताला बॅरल लागला. तसा त्यांना अंदाज आला की इथे कुठेतरी पाण्यात मोटर सोडली आहे आणि नेमका दुसरा हात त्याच सोडलेल्या मोटारीच्या दोरीला लागला. मोटारीच्या दोरीने आयुष्याची दोरी बळकट आहे. हे सिद्ध झाले आणि बरोबर पावणे तीन तासांचा जीवघेणा संघर्ष थोडाफार  थांबला. ते तसेच दोन तीन मिनिटे दोरी धरून थांबले. जिवाच्या आकांताने त्यांनी पाण्यातून वर येण्याचा खूप प्रयत्न केला. पण अंगात ताकदच नसल्यामुळे त्यांना पाण्याबाहेर येता येत नव्हते. कसेतरी ते पात्राबाहेर आले. पाच मिनिटे ते तसेच पडुन राहिले. आपण जगलो, पण आता एखादी मगर येऊन पुन्हा नदीत घेऊन गेली तर काय? या विचाराने ते पटकन उठले. कसेतरी अडखळत गुडघाभर चिखलातून चारशे मीटरवर जाऊन पुन्हा ते शांतपणे बसले. तिथून त्यांना एका ठिकाणी लाईट चालू असलेली दिसली. तिथे त्यांनी हकीगत सांगितली. ते बुर्ली गावाच्या विशाल रानमाळे कुटुंबियांचे घर होते. त्यांनी शेकोटी करून त्यांना उब आणि धीर दिला. शिरगावचे फोटोग्राफर हणमंत हवलदार यांच्याशी संपर्क करून राजेंद्र मोटे जिवंत असल्याची माहिती दिली. हवलदार यांनी वाळव्यात ती कळवली. प्राथमिक आरोग्य केंद्र वाळवा येथे तपासणी करून त्यांना घरी आणण्यात आले. राजेंद्र मोठे सुखरूप घरी आलेवर त्यांच्या कुटुंबियांना जिवात जीव आला.

Post a Comment

0 Comments

Breaking News
Loading...