राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) इस्लामिक स्टेटशी (इसिस) संबंधित एका डॉक्टरला कोंढव्यातून अटक केली. त्याच्या घराच्या झडतीत इसिसशी संबंधित माहिती हस्तगत करण्यात आली असून, ही माहिती इलेक्ट्रॉनिक गॅझेटच्या स्वरुपात असल्याचे आढळून आले आहे. हा डॉक्टर ‘इस्लामिक स्टेट’च्या महाराष्ट्रातील मॉडय़ूलचाच एक भाग असून, याप्रकरणी आत्तापर्यंत पाच जणांना एनआयएने अटक केली आहे.
डॉ. अदनानली सरकार (43) असे अटक आरोपीचे नाव आहे. त्याच्या घराच्या झडतीमध्ये इलेक्ट्रॉनिक्स गॅझेट, कागदपत्रे सापडली. त्याचा थेट संबंध इस्लामिक स्टेटशी असल्याचे उघड झाले आहे. इस्लामिक स्टेटच्या हिंसक कारवायांमध्ये सहभागी होण्यासाठी तरुणांना प्रोत्साहित करणारे साहित्य त्यामध्ये होते. जेणेकरून तरुण इस्लामिक स्टेटमध्ये सामील होतील. आरोपींनी वेगवेगळय़ा नावांनी ओळखल्या जाणाऱ्या इसिसच्या दहशतवादी कारवाया पुढे नेण्याचा कट रचला होता. जसे की इस्लामिक स्टेट (आयएस), इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड लेव्हंट (आयएसआयएल), इस्लामिक स्टेट ऑफ इराक आणि सीरिया (आयएसआयएस), दाईश, इस्लामिक स्टेट इन खोरासान प्रांत (आयएसकेपी) इसिस विलायत खोरासान, इस्लामिक स्टेट ऑफ इराक आणि शाम खोरासान (आयएसआयएस-के) अशी ही संघटनांची नावे आहेत.
या प्रकरणात पाचवी अटक
यामाध्यमातून देशाची एकता, अखंडता, सुरक्षा आणि सार्वभौमत्व बिघडवण्याचा प्रयत्न आरोपी करत होते. या संघटनांच्या माध्यमातून इसिस भारत सरकारविरुद्ध युद्ध पुकारण्याच्या तयारीत होते. एनआयएच्या तपासानुसार ‘महाराष्ट्र आयसिस मॉडय़ूल’ प्रकरणातील ही पाचवी अटक आहे. यापूर्वी एनआयएने तीन जुलै 2023 रोजी मुंबई, ठाणे आणि इतर परिसरात मोठय़ा प्रमाणावर शोध घेतल्यानंतर चौघांना अटक केली होती. मुंबईतून तबिश नासेर सिद्दीकी, पुण्यातून जुबेर नूर मोहम्मद उर्फ शेख अबू नुसैबा आणि ठाण्यातील शरजील शेख आणि झुल्फिकार अली बडोदावाला यांना अटक करण्यात आली आहे.



0 Comments