आमची कन्या चौथीला आहे. इरसाळवाडी ची ती घटना घडल्यापासून रात्री तिला कुशीत घेऊन झोपलं की मनात विचारांचं काहूर सुरू होतं . बाहेर पाऊस पडत असतो मनात विचारांचा मुसळधार पाऊस सुरू असतो. सारखं वाटत राहतं त्या रात्री सुद्धा त्या वाडीत एखादा बाप आपल्या लेकराला कुशीत घेऊन असाच झोपला असेल. मातीचा ढिगारा खाली आला असेल, घराची भींत पडली असेल तेंव्हा बापाला संकटाची जाणीव झाली असेल. भिंतीखाली दबलेल्या बापाची मिठी अधिक घट्ट झाली असेल. छातीचा कोट करून स्वतः मृत्यूला सामोर जात त्यांन आतल्या बाळाला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला असेल. बापाच्या उबे खाली बाळ सुरक्षितही असेल.... वाट पाहत असेल ढिगार्या बाहेरून येणाऱ्या मदतीची.... पण आम्ही त्याला मदत करू शकलो नाही.
त्या रात्री आमचे तहसीलदार, प्रांताधिकारी आणि आजूबाजूच्या गावातील धाडसी माणसं वाऱ्या पावसाशी झुंजत, काळोखाची तमा न बाळगता जीवाची पर्वा न करता इरसाळवाडी वर पोहोचली होती. मंत्री, विविध पक्षाचे नेते, आयुक्त यांनी गडाच्या पायथ्याशी मदतीसाठी प्रशासन सज्ज ठेवलं होतं. एन. डी. आर. एफ. चे जवानही लवकरात लवकर घटनास्थळी दाखल झाले होते.... तरी आम्हाला फारसं यश आलं नाही. कारण घटनास्थळापर्यंत आम्ही एक जेसीबी नेऊ शकलो नाही.
आश्रम शाळेत शिकायला असलेली या वाडीतील मुलं वाचलीत. काहींचे आई-वडील त्या ढिगार्याखाली गाडले गेलेत. मी कल्पना करतो, ही मुलं कधीकाळी जेव्हा टीव्हीवर बातमी पाहतील की आमची यानं चंद्रावर पोहोचलीत. देशभरात शास्त्रज्ञांचे कौतुक चालू आहे. तेव्हा त्या मुलांच्या मनाला काय वाटेल... ती पोरं मूकपणे स्वतःशीच बोलतील *"आमची यानं चंद्रावर पोहोचली पण इरसाळच्या डोंगरावर जेसीबी पोहोचवणारा शास्त्रज्ञ अजून जन्माला यायचा आहे."*
शिवरायांच्या रायगडावरील राज्याभिषेकाच्या वेळेस तेथे मोठाले हत्ती बघून इंग्रज आश्चर्यचकीत झाले होते. विचार करत होते हे मोठे हत्ती रायगडावर कोणत्या वाटेने आले असतील? त्यांना काय माहित की राज्याभिषेक कधी न कधीतरी होणारच आहे या दूरदृष्टीने हत्तीची पिल्ले लहान असतानाच त्यांना शिवरायांनी रायगडावर आणून ठेवले होते. राज्याभिषेकाच्या वेळेस रायगडावर असलेले मोठाले हत्ती म्हणजे राजांच्या दूरदृष्टीचा विजय होता.
जेसीबी निर्जीव यंत्र आहे. ते लहानाचं मोठं होऊ शकत नाही. परंतु अनेक तज्ञ मित्रांसोबत या घटनेवर चर्चा करताना असा सूर निघाला की अख्खा जेसीबी वरती नेता येणं अवघड असलं तरी जेसीबी चे वेगवेगळे पार्ट सुटे करून अगोदरच डोंगरामध्ये असलेल्या वाड्या वस्त्यांवर नेऊन ठेवता येतील का? म्हणजे असं काही घडलं तर आठ दहा कौशल्य असलेली माणसं वरती नेऊन काही वेळात अख्खा जेसीबी उभा करता येऊ शकेल. यावर विचार होणं आवश्यक आहे.
सह्याद्रीच्या कडे कपारीत इरसाळवाडी सारख्या अजून कितीतरी वाड्या असतील जिथे स्वातंत्र्याला 75 वर्ष होऊनही त्या ठिकाणी रस्ता देखील पोहोचला नाही. डांबरी तर सोडाच पण साधा बैलगाडीचाही रस्ता नाही.... इरसाळवाडी पर्यंत साधा दगड धोंड्याचा जरी रस्ता असता तरी त्या रात्री जेसीबी तिथे पोहोचला असता.
आम्ही सर्वांनीच यावर गांभीर्याने विचार करायला हवा. आमच्या शास्त्रज्ञांची बुद्धिमत्ता, राजकीय इच्छाशक्ती आणि आम्हा सर्वांची जबाबदारी यातूनच हे घडेल. तरच आम्ही डोंगरातील आमच्या आदिवासी बांधवांच्या या वाडी वस्त्या वाचवू शकू...
आणि असं झालं नाही तर... तर चंद्रावर पोहोचलेल्या आधुनिक समाजातल्या या माणसाला हा डोंगरावरचा माणूस कधीही माफ करणार नाही...
सध्या तरी इरसाळगडाच्या मातीच्या ढिगार्याखाली आपले जीवन संपवावं लागणाऱ्या आमच्या आदिवासी बांधवांची माफी मागणं एवढंच आमच्या हाती आहे ...." तुम्हाला वाचवावं असं प्रत्येकालाच वाटत होतं, असंख्य मूक मनातून असंख्य प्रार्थना चालू होत्या. परंतु त्या प्रार्थनांना आणि प्रयत्नांना यश आलं नाही. आम्ही तुम्हाला वाचवू शकलो नाही."
आम्हाला माफ करा 🌹🙏
---------------------------------------
शिवव्याख्याते प्रशांत देशमुख.
मो.9822 650 280



0 Comments