नाशिक/ गीता संघर्ष वृत्तसेवा।
गौरीच्या मृत्यूनंतर आदिवासी भागात काम करणाऱ्या श्रमजीवी संघटनेने या घटनेकडे पोलीस प्रशासनाचं लक्ष वेधून घेतलं, त्यानंतर पोलीस तक्रार दाखल करण्यात आली. 
नाशिक जिल्ह्यातील 11 वर्षांच्या गौरी आगिवले या आदिवासी मुलीचा सरकारी रुग्णालयात 7 सप्टेंबरला मृत्यू झाला.
मेंढ्यांचा सांभाळ करण्यासाठी अहमदनगरच्या मेंढपाळाकडे तिचा सौदा झाला होता. असा सौदा झालेली अनेक मुलं आणि मुली वेठबिगार म्हणून काम करत असल्याचं त्यानंतर पुढे आलं. गौरीचा नाशिकच्या सरकारी रुग्णालयात मृत्यू झाला. मृत्यूच्या 10 दिवस आधी म्हणजे 27 ऑगस्टच्या मध्यरात्री तिला उभाडे गावातल्या तिच्या घरासमोर आणून टाकण्यात आलं होतं.
तिची आई तुळसाबाई आगिवले सांगत होती, "त्या दिवशी पहाटे 4 वाजता आम्ही घराबाहेर आलो तर बाहेर गौरी पडलेली दिसली. तिला दारात आणून टाकलं होतं. बॅटरीच्या उजेडात पाहिलं तर आमचीच गौरी असल्याचं कळलं. तिच्या गळ्याभोवती फास दिल्यासारखी जखम होती. कोपराजवळ हाताला मार लागलेला दिसत होता. कंबर गेली होती. हात-पाय वाकडे झालेले होते."
तिच्या शवविच्छेदन अहवालात स्पष्ट म्हटलंय की- संपूर्ण गळ्याभोवती गोलाकार जखमेची खूण, हाताच्या उजव्या कोपऱ्याजवळ खोल जखम, पाठीवर काही ठिकाणी मुका मार लागल्याचे लालसर-चॉकलेटी रंगाचे व्रण आढळून आले आहेत. गौरीसारखेच उभाडे गावातल्या अनेक मुलांचे वेठबिगार म्हणून सौदे झाल्याचं पुढे आलं.
असा सौदा का केला यावर गौरीची आई म्हणाली, "गौरीच्या वडिलांनी दारूच्या बदल्यात तिला मेंढपाळाकडे दिलं. तेव्हा मी मजुरीसाठी बाहेर गेले होते.''
गौरी वयाच्या 8 व्या वर्षापासून अहमदनगरच्या मेंढपाळाकडे होती. अवघ्या तीन हजार रुपयासाठी तिच्या वडिलांनी संगमनेरच्या विकास कुदनर या मेंढपाळाकडे मेंढ्या चारण्यासाठी सोपवलं. गेल्या आठवड्यात विकासने गौरीला काम करत नाही म्हणून मार मार मारलं. त्यामुळे तिची तब्येत अचानक खालावली, असं पोलिसांच्या तपासात पुढे आलंय.
तिच्या हत्येप्रकरणी आरोपी मेंढपाळ विकास कुदनरला संगमनेर पोलिसांनी अटक केली
गौरीची आई तुळशीबाई आगिवले इगतपुरीत वीटभट्टीवर मजुरी करून गुजराण करते. तर वडील सुरेश देखील मजुरी करतात. ते संपूर्णपणे दारूच्या आहारी गेले असल्याचं आईचं म्हणणं आहे.
आगिवले दांपत्याला 4 मुलं. त्यात गौरी सर्वात मोठी होती, त्यानंतरचा साईनाथ 10 वर्षाचा आहे. तर लहान भाऊ मूकबधिर आहे. साईनाथला संगमनेरच्या डिग्रजमधील मेंढपाळाकडे विकलं गेलं. तेव्हा तो केवळ 6 वर्षांचा होता. आपली मातृभाषा कातकरीही तो आता विसरला आहे.
'मालक कुऱ्हाडीच्या दांड्याने मारायचा'
उभाडे गावातील 11 मुलांना अशाच प्रकारे मेंढपाळाकडे देण्यात आलं. प्रत्येकी 2 ते 4 हजार रुपये आणि एका मेंढीच्या बदल्यात कातकरी पाड्यांवरच्या मुलांची खरेदी अहमदनगर जिल्ह्यातील मेढपाळांकडून करण्यात आल्याचं वास्तव समोर आलंय.
गौरीच्या मृत्यूनंतर इथल्या काही मुलांची वेठबिगारीतून सुटका करण्यात आलीये आणि ती गावी परतली आहेत.
ही सर्व मुलं 7 ते 12 वर्षांच्या वयोगटातील आहेत. शेळ्या-मेंढ्या चारण्यासाठी, त्यांच्या लेंड्या काढण्यासाठी, घोड्यांना पाणी पाजण्यासाठी ही मुलं काम करतात.
वयाच्या सातव्या-आठव्या वर्षांपासून ही मुलं शाळेत जाण्याऐवजी मेंढ्या, घोडे अशा जनावरांच्या मागे बिगारी करतायत.
साईनाथ धड बोलूही शकत नाही. बिचकत बिचकत आपल्यासोबत जे घडलं ते सांगत होता. काम केलं नाही तर मालक कुऱ्हाडीच्या दांड्याने मारायचा, तो सांगत होता.
अशीच हकीगत गावातल्या गोकुळ आगिवले आणि करण वाघनेही सांगितली. भांडी घासण्यापासून सगळी जास्तीची काम करून घेतली जायची, नाहीतर मारहाण केली जायची.
या मुलांची खरेदी-विक्री करणारा कांतीलाल करांडे फरार आहे. मेंढपाळ विकाससह पाच जणांना पोलिसांनी अटक केलीये.
पण आईवडिलांनी आपल्या पोटच्या मुलांना कोणत्या मजबुरीमुळे असं कामावर धाडलं असेल
उभाडे वस्तीवरल्या पाकोळाबाई वाघ यांना सहा मुलं. त्यांच्या दोन मुलांचीही मेंढपाळांच्या वेठबिगारीतून सुटका झालीये.
पाकोळाबाई यांचा मुलगा करण पळशी-वनकुटे याला पारनेर तालुक्यातल्या गावातून सोडवून आणलंय.
पाकोळाबाई म्हणतात, "मध्यस्थ कांतीलाल आमची मुलं रस्त्यावर खेळताना बघायचा. आम्हाला म्हणायचा- तुमची मुलं इथे रस्त्याजवळ खेळतात, एखाद्या गाडीने उडवलं तर कळणारही नाही. मला मुलं दिलीत तर त्यांचं चांगलं होईल. वर्षाला 2-3 मेंढ्या आणि 10 हजार रूपये देईन. कांतीलालने मेंढ्या दिल्या नाहीच पण फक्त 2 हजार रूपये दिले. ''
"तिकडे गेल्यावर आम्ही मुलांना फोन करायचो. कुत्रा चावला होता तरी मुलं फोनवर आम्हाला सांगायची की आम्ही व्यवस्थित आहोत. मेंढपाळ तसं मुलांना सांगायला लावायचा
पहाटे कोकरांना पाणी पाजून निघायची आणि रस्त्यात मिळेल ते मागून खायची. आता इथे आल्यावर मुलं सांगतायत की त्यांचे हाल काय व्हायचे. आम्हाला वाटलं होतं की इथे ही इतकी मुलं कशी सांभाळायची? म्हणून तिकडे पाठवली होती.
अजून किती मुलं बेपत्ता?
हा सगळा प्रकार उघडकीस आणणाऱ्या श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अशी आणखी किती मुलं मेंढपाळांकडे दिली, याचा शोध सुरू केलाय.
श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते गोकुळ हिलम यांच्या मते- नाशिक, अहमदनगरच नाही तर ठाणे आणि पालघर जिल्ह्यात वेठबिगारीसाठी मुलांची खरेदी-विक्री करण्यात आली आहे.
"वेठबिगारीसाठी खरेदी-विक्री झालेली 8 मुलं अजून बेपत्ता आहेत. पालकांना घेऊन नाशिक आणि अहमदनगरमध्ये पोलीस स्टेशन्समध्ये तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. गावकुसाला तसंच माळरानावर राहणाऱ्या कुटुंबियांना पैशांची लालूच दाखवून वेगवेगळ्या कामाला घेऊन त्यांना बंधबिगारीला लावलं जातंय. जोडप्यांना तसंच लहान मुलांना वेठबिगारीसाठी नेऊन त्यांना मानसिक, शारीरिक त्रास दिला जातो. यामागे रितसर रॅकेट आहे."
उभाडे ग्रामपंचायतीत येणारी 20 कातकरी कुटुंबांची वस्ती गेली अनेक वर्षं गावकुसावर राहतेय. ही कुटुंब भूमिहीन, जनावरं नसलेली, घरांची जमीनही मालकीची नसलेली, वीज-पाणी अशा सुविधा नसलेली अशी आहेत. वीटभट्टी, खडी फोडायला आणि ऊसतोडीसाठी स्थलांतर करतात तर काही जण गावातच शेतमजुरी करतात. लॉकडाऊनच्या काळात त्यांचे रोजागाराअभावी हाल झाले होते.








0 Comments