सांगली/ गीता संघर्ष वृत्तसेवा
जत तालुक्यातील डफळापूरपासुन चार कि.मी. अंतरावर असलेल्या कुडनूर गावांमध्ये दुसऱ्यांदा हँडग्रेनेड बॉंब आढळल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.
हॅन्ड ग्रेनेड बॉम्बशोधक पथकाच्या ताब्यात देण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू असून शाळेच्या परिसरात हॅन्ड ग्रेनेड सापडल्याने गावात चिंतेचं वातावरण आहे. हा हॅन्ड ग्रेनेड येथे आला कसा, याबाबत आता पोलिसांसह गावकऱ्यांना प्रश्न पडला आहे.
दरम्यान, याच गावात बॉम्ब सापडण्याची ही दुसरी वेळ असुन पाच वर्षांपूर्वीही येथे बाँबसदृश्य वस्तु आढळुन आली होती. शनिवारी ही घटना उघकीस येताच याबाबतची माहिती कुडनूरचे पोलीस पाटील मंजुषा मनोहर कदम यांनी जत पोलीसाना तातडीने माहिती दिली. जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे यांनी मोठा पोलीस फौजफाटा सोबत घेऊन घटनास्थळी धाव घेतली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी सांगलीहुन बाँबविरोधी पथक, श्वानपथक बोलावून घेतले
कुडनूर येथील जि. प. शाळेच्या मुख्य इमारतीचे बांधकाम सुरू असल्याने सध्या इयत्ता सहावीचा वर्ग सदाशिव व्हनमाने यांच्या गावात असणाऱ्या कौलारु घरात भरवण्यात आला आहे. आज शनिवार असल्याने सकाळच्या सत्रात शाळा भरली होती. शाळा सुटल्यावर काही मुले क्रिकेट खेळत असताना त्यांच्याकडील बॉल आतल्या खोलीत पडल्याने तो आणण्यासाठी काही मुले गेली असता त्यांना बाँबसदृष्य वस्तु आढळुन आली. मात्र मुलांना याबाबतची कोणतीही कल्पना नव्हती.
त्यानंतर उपस्थित काही मंडळीच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी गावातील प्रतिष्ठित नागरिक यांना माहिती दिली आणि ही बाब गावचे पोलीस पाटील यांच्या कानावर घातली. यानंतर जत पोलीसांना घटनेची माहिती देण्यात आली. घटनास्थळी जतचे डीवायएसपी रत्नाकर नवले, जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे तसेच पोलीस कर्मचारी, श्वानपथक, बाँबविरोधी पथक दाखल झाले. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हा बॉम्ब कोणी व कुठून आणला याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. तसेच याची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. हा बॉम्ब जिवंत असल्याचे सांगण्यात येत असून, त्यावर अरबी अक्षरात माहिती आहे. यावेळी लिओ श्वान चौकशीसाठी कुडनूर येथे दाखल होता.
गावात पाच वर्षां पूर्वी एकदा असाच हँडग्रेनेड सापडला होता. या गावात मोठ्या प्रमाणात सैन्य दलात लोक आहेत. त्यामुळे तेथून कुणी हा बॉम्ब आणला का याचाही तपास करण्यात येत आहे.









0 Comments